लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई – दहा लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रशासक संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दहा लाख रुपयांची लाच प्रकरणा बाबत पकडले आहे. या धडक कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यातील प्रशासनिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक कंत्राटदाराने महानगरपालिकेकडील इमारतीच्या बांधकामाशी संबंधित थकीत देयकांच्या मंजुरीसाठी आयुक्त खांडेकर यांनी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACB पथकाने सापळा रचला आणि गुरुवारी प्रत्यक्ष कारवाईदरम्यान आयुक्त खांडेकर यांनी मागितलेली काही रक्कम स्वीकारल्याचे आढळले.
यानंतर ACB पथकाने तत्काळ खांडेकर यांना त्यांच्या निवासस्थानीच जेरबंद केले. घटनेनंतर जालना ACB कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे. संबंधित प्रकरणातील कागदपत्रे, मोबाईल कॉल रेकॉर्डिंग आणि आर्थिक व्यवहाराचे पुरावे तपासले जात असून, लवकरच आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एवढ्या मोठ्या रकमेच्या लाच प्रकरणात अटक झाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि आश्चर्याचे वातावरण आहे. या घटनेने जालना महानगरपालिकेच्या कार्यपद्धती, पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील नागरिक व सामाजिक संघटनांकडून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणातील पुढील तपास जलदगतीने सुरू केला आहे.
Comments
Post a Comment