अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल


वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण 

    जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.

 जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

     प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन्य यंत्रणांच्या समन्वयाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

    जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक पूर्णतः रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. विशेष बाब म्हणजे, अवैध वाळू उत्खननाबाबत गोपनीय स्वरूपात माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येणार असून, दिलेल्या माहितीनुसार कारवाई यशस्वी झाल्यास माहिती देणाऱ्यास नियमानुसार योग्य बक्षीस देण्यात येणार आहे.

    या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अवैध वाळू माफियांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या