भीषण अपघात:२१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
कारचा व कंटेनर चा भीषण अपघात झाला असून कार कंटेनरला धडकून अंबड येथील तरुणाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला. यात कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर करमाड परिसरातील सटाणा शिवारात सोमवारी (२३ जून) तीनच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. वळण घेणाऱ्या कंटेनरला भरधाव वेगाने आलेली कार जोरात धडकली. या अपघातात कारमधील एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आदित्य शिवाजी धुपे (वय २१, रा. डावरगाव, ता. अंबड, जि. जालना) असे असून, गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नवनाथ धनंजय भिडे (वय ३५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) असे आहे. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर (क्र. एमएच ४३ वाय ६०६५) जालन्याकडून येत होता आणि डीएमआयसीकडे जाणाऱ्या करमाड-सटाणा शिवारातील उड्डाणपुलाजवळ वळत होता. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगरकडून भरधाव वेगात आलेल्या कारने (क्र. एमएच २३ वाय २२८१) कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरमध्ये अडकून तिचा चक्क चूर झाला.
घटनास्थळी करमाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. मृतदेह आणि जखमीला तत्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पोलीस घटनेचा तपास करत असून अपघाताचे कारण वाहनाचा अतिवेग असल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होत आहे.
Comments
Post a Comment