स्थानिक प्रशासनाला न कळवता वरिष्ठ अधिकाऱ्यांची पिकअपने गोदापात्रात धडक- अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई
सहा ट्रॅक्टर आणि एक दुचाकी जप्त, चौघांवर गुन्हा दाखल, १० जण अद्याप अज्ञात
गुप्त माहितीवर आधारित धडाकेबाज कारवाई !
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भादली येथील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई २१ एप्रिलच्या मध्यरात्री २.१५ वाजता अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंग, प्रभारी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल आणि तहसीलदार योगिता खटावकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
कारवाई दरम्यान गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक करत असलेले सहा ट्रॅक्टर आणि MH-21-BS-143 क्रमांकाची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. सदर वाहने तात्काळ जप्त करून घनसावंगी तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत.
महसूल विभागाच्या तक्रारीनुसार घटनास्थळी चार व्यक्तींची ओळख पटली त्यांची नावे पुढीलप्रमाणे विष्णू भाऊसाहेब कटुले (रा. कुंभार पिपळगाव), मोहन राजाभाऊ सोळंके (रा. कारळा ता परतूर), सुदर्शन भगवान वीर (रा. भादली), रवि निळकंठ तौर (रा. भादली) असून १० अनोळखी व्यक्ती अवैध वाळू उपसात सामील असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांनी दंड प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अंतर्गत लागू जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राम महसूल अधिकारी भरत कामाजी बारसे यांच्या तक्रारीवरून धनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पंचनाम्यासाठी महसूल विभागातील बी.के. बारसे, व्ही.एस. बुल्लुडे व संतोष सुभाष सुपेकर हे उपस्थित होते.
कारवाईची पद्धतच ठरली यशस्वीतेची गुरुकिल्ली
सामान्यतः कारवाईची माहिती आधीच बाहेर गेल्याने आरोपी फरार होतात व कारवाई अपूर्ण राहते. मात्र यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय वाहनांचा वापर टाळत खासगी पिकअपने स्थलावर जाऊन गुप्तता राखून कारवाई केली, यामुळे मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.
कारवाईपूर्वी माहिती मिळते म्हणून आरोपी पळतात. म्हणून आम्ही पिकअपने गेलो
पोलीस आणि महसूल विभाग कारवाई करणार हे आधीच काही अवैध वाळूधंदेवाल्यांना समजते. त्यामुळे ते घटनास्थळावरून पळ काढतात. यामुळे मोठी कारवाई होत नाही. म्हणून आम्ही गुप्ततेने, पिकअपने जाऊन कारवाई केली.
- सिद्धार्थ बारवाल, प्रभारी पोलीस अधीक्षक
ही कारवाई भविष्यात अशा अवैध वाळू उपसांवर आळा घालण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment