घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
एका लहानशा गावातून उगम पावलेल्या डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या चव्हाण या सख्या बहिणींनी एकाच वेळी एमबीबीएस पदवी मिळवून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. एकीने अंबाजोगाई येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून, तर दुसरीने जळगाव येथून ही शैक्षणिक कामगिरी पार पाडली आहे.परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव या गावातील या बहिणी आहेत.
त्यांच्या या यशामागे आहेत त्यांचे वडील सखाराम चव्हाण, जे सध्या येसेगाव (ता. जिंतूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलींमध्ये शिक्षणाची गोडी लावली आणि त्या दोघींना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले. डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिंतूरच्या संचारेश्वर विद्यालयात, तर माध्यमिक शिक्षण जवाहर विद्यालयात पूर्ण केले.
शालेय जीवनातच त्यांचे आजोबा सतत सांगायचे, "मुलींनो, डॉक्टर व्हा आणि समाजसेवा करा." या प्रेरणादायी वाक्यांनीच दोघींनी मनाशी ठरवले होते – डॉक्टरच व्हायचं! याच ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी NEET परीक्षेची तयारी सुरू केली आणि २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून एमबीबीएस प्रवेश घेतला.
या दोघींनी सलग पाच वर्षे सहा महिने कठोर परिश्रम घेतले, अभ्यासात सातत्य ठेवले आणि अखेर एमबीबीएसची पदवी सन्मानाने मिळवली. डॉ. नेहा अंबाजोगाईच्या तर डॉ. दिव्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्या.
"गुरुजनांचे मार्गदर्शन, आई-वडिलांची साथ आणि आपले स्वप्न लक्षात ठेवून आम्ही सुरुवातीपासूनच अभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले. कितीही अडचणी आल्या तरी हार न मानता यशासाठी प्रयत्न केले," असे मत डॉ. नेहा आणि डॉ. दिव्या यांनी व्यक्त केले.
"माझ्या दोन्ही मुली डॉक्टर झाल्याचा मनस्वी आनंद आहे. फक्त माझ्या मुलींनीच नव्हे, तर गावातील प्रत्येक विद्यार्थ्याने शिकावे, यशस्वी व्हावे, यासाठी मी शैक्षणिक जनजागृती करत आलो आहे. मुलांनी शिक्षणातून प्रगती करावी, हीच माझी खरी कमाई," असे सखाराम चव्हाण यांनी सांगितले.
ही कथा केवळ दोन बहिणींच्या यशाची नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे – जिथे शिक्षणाची आस, कष्टाची तयारी आणि योग्य मार्गदर्शन असेल, तिथे कुठल्याही परिस्थितीतून यश गाठता येते हे या दोघींनी सिद्ध केले आहे.
Comments
Post a Comment