वाळू माफियांचा कर्दनकाळ पुलकित सिंह यांची बदली; जनतेत नाराजी, वाळूमाफियांत आनंद ! महसूल व पोलीस विभागाची डोळेझाक
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
अंबडचे उपविभागीय अधिकारी (एसडीएम) तथा सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून बदली झाल्याची शासकीय घोषणा होताच अंबड व घनसावंगी तालुक्यातील जनतेत तीव्र नाराजी पसरली असून, दुसरीकडे वाळू माफियांमध्ये मात्र जल्लोषाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पुलकित सिंह यांच्या धाडसी कारवायांमुळे बेकायदेशीर वाळू उपसावर लगाम बसला होता. परंतु त्यांच्या बदलीनंतर अवैध वाळू वाहतूक पुन्हा दिवसाढवळ्या सुरू झाल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
बदलीनंतर माफियांना "सुट"- शासकीय ऑर्डर मिरवताय माफिया!
पुलकित सिंह यांच्या बदलीची शासकीय ऑर्डर काही वाळू माफियांनी थेट खिशात ठेवून मिरवल्याचे प्रकार स्थानिक पातळीवरून समोर आले आहेत. हेच चित्र त्यांचे कार्यकाळ किती त्रासदायक ठरले होते याची साक्ष देत आहे. बदलीनंतर २५ एप्रिल रोजी सकाळीच घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी रोडवरून वाळूने भरलेले हायवा वाहने सर्रास फिरताना आढळली.
२१ एप्रिलची थरारक कारवाई शेवटची
२१ एप्रिलच्या मध्यरात्री २.१५ वाजता अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह, प्रभारी पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल आणि तहसीलदार योगिता खटावकर यांच्या नेतृत्वाखाली भादली येथील गोदावरी नदीपात्रात मोठी कारवाई पार पडली होती. कोणताही गाजावाजा न करता करण्यात आलेल्या या कारवाईत अनेक वाहने जप्त झाली. ही कारवाई पुलकित सिंह यांचा अंबडमधील शेवटचा परंतु सर्वाधिक प्रभावी आणि लक्षवेधी दणका ठरला.
अधिकारी म्हणून वेगळी ओळख
पुलकित सिंह यांनी केवळ वाळू माफियांविरोधातच नव्हे तर प्रशासनातील रखडलेली कामे मार्गी लावण्यातही लक्षणीय योगदान दिले. मराठा व कुणबी जात प्रमाणपत्रे, ऑनलाईन/ऑफलाईन प्रकरणे तातडीने मार्गी लावून त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांच्या बदलीने नागरिकांत खंत व्यक्त होत आहे.
महसूल व पोलीस विभागाची डोळेझाक
त्यांच्या बदलीनंतर अवैध वाळू उपसा व वाहतुकीने पुन्हा उचल घेतली आहे. गोदावरीकाठच्या अनेक गावांतून दिवसाढवळ्या वाळूची वाहतूक सुरू असून महसूल विभाग व पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. पोलीस विभागावरही आरोप होत आहेत की मोठे मासे सोडून दिले जातात, तर केवळ लहान मासे पकडले जातात व थातूर मातुर कारवाई करण्यात येते. दरम्यान तीर्थपुरीला पोलीस नव्याने ठाणे झाल्यापासून तीर्थपुरी व परिसरात अवैध धंद्यांना मोठा ऊत आला असून पोलीस प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका दिसून येत आहे.
पुलकित सिंह यांच्या कार्यकाळात अंबड-घनसावंगी तालुक्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासनाची कठोरता दिसून आली. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा वाळू माफियांना मोकळे रान मिळणार का? हा प्रश्न सध्या जनतेच्या मनात घर करून आहे. एकूणच, एक कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी गमावल्याचे दु:ख अंबड-घनसावंगी परिसरात जाणवत आहे. आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा एकदा माफियांना बळ येत असल्याचे दृश्य साऱ्यांनाच चिंताजनक वाटते.
Comments
Post a Comment