घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

अशीही जिल्हा परिषदेची शाळा: पहिलीपासून इंग्रजी-मराठी वाचन, शिक्षक स्वतःच्या खर्चातून देतात बक्षिसे

 पण वर्गखोल्यांचे प्लास्टर मात्र कधीही कोसळण्याच्या स्थितीत!


ऑन दी स्पॉट ग्राउंड रिपोर्ट बाचेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     देशभरात शिक्षण क्षेत्रात खासगी इंग्रजी शाळांचा प्रभाव वाढत चालला असतानाच ग्रामीण भागात काही जिल्हा परिषद शाळा आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे त्याचं जिवंत उदाहरण ठरतं. याबरोबरच घनसावंगी तालुक्यातील रामगव्हाण, मासेगाव, चित्रवडगाव, कंडारी परतूर, साकळगाव या शाळेतही चांगली गुणवत्ता आहे. अशी माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली.

    ही शाळा शिक्षणात नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक, सामाजिक व नैतिक विकासात अग्रेसर आहे. सध्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १५४ विद्यार्थी (७३ मुले आणि ८२ मुली) शिक्षण घेत आहेत. विशेष बाब म्हणजे पहिलीपासूनच विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी आणि मराठी वाचन करतात, जे विशेषतः ग्रामीण भागात फारच दुर्मिळ चित्र आहे.

शिक्षकांचा ‘स्वखर्ची’ शिक्षणमंत्र: गुणवंतांना मिळतं प्रोत्साहन

    या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केवळ शाळेच्या मर्यादित संसाधनांवर विसंबून राहत नाहीत. दर आठवड्याला आणि महिन्याला चाचण्या, शब्दार्थ स्पर्धा, भाषण स्पर्धा इ. घेतल्या जातात. प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला बक्षिसे शिक्षक स्वतःच्या खिशातून देतात. कोणतीही शासकीय योजना न वाट पाहता त्यांनी शिक्षणाचा खरा उज्वल मार्ग निवडला आहे.

   येथे मुख्याध्यापक इंदरराव हर्षे यांच्या नेतृत्वाखाली किरण सानप, नितीन कोल्हे, प्रशांत शिंदे, संदीप सातपुते, फराह सय्यद आणि श्रीमती सैंदाने हे शिक्षक संपूर्ण समर्पणभावाने कार्यरत आहेत.

विद्यार्थ्यांचा ‘स्टेट लेव्हल’पर्यंत झेप

    या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे अनुराज धानुरे "मी ज्ञानी होणार" स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक., कल्याणी वाजे – महादीप चाचणीतून विमान प्रवासासाठी निवड, बीटीएस परीक्षेत गुणवत्तायादीत समावेश, ज्ञानेश्वरी मिंधर, वैष्णवी मिंधर, समर्थ मुळे – जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड, श्रद्धा मुळे – मराठी भाषा गौरव दिन निबंध स्पर्धेत जिल्हा चौथा क्रमांक. दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा भावना, आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य यांचा विकास होत आहे.

परिपाठातून संस्कारांचं रोपण

    दररोज शाळेचा परिपाठ विद्यार्थ्यांच्या सहभागाने घेतला जातो. यातून त्यांना वक्तृत्व, शिस्त, जबाबदारी, आणि सामाजिक जाणीव याचे धडे मिळतात. आई-वडील दिन, आजी-आजोबा दिन, विविध जयंती-पुण्यतिथी अशा विशेष दिवसांचं आयोजनही सातत्याने केलं जातं.


पण यशस्वी वाटचालीला इमारतीची दुरवस्था घालते खिंडार!

    सर्वच बाबतीत आदर्श ठरणाऱ्या या शाळेची इमारतीची स्थिती मात्र अत्यंत दयनीय आहे. शाळेतील ७ पैकी २ वर्गखोल्यांवर पत्र्याच्या आहे, तर ४ खोल्यांना पावसाळ्यात गळती लागते. काही वर्गखोल्यांचे स्लॅब इतके जीर्ण झाले आहेत की प्लास्टर कधीही गळून पडण्याची शक्यता आहे. शिक्षकांनी पावसाळ्यापासून संरक्षणासाठी स्लॅबवर ताडपत्री टाकून संरक्षण केलं आहे, परंतु ही केवळ तात्पुरती सोय आहे.

     विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या शाळेतील शिक्षणासाठीची जिद्द आणि इमारतीची मोडकळीची अवस्था यामध्ये पूर्ण विरोधाभास आहे. शासन आणि प्रशासनाने या शाळेकडे तातडीने लक्ष देऊन वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन इमारत वा सुसज्ज सुविधा द्याव्यात, ही वेळेची गरज आहे.


उदाहरण घ्यावं अशी शाळा - पण... पाठिंबा मिळायला हवा!

     बाचेगाव शाळेच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षणाचा खरा अर्थ साकारला आहे. पण हा आदर्श जास्त काळ टिकवायचा असेल, तर शासनानेही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.अशा शाळा जर सुसज्ज सुविधा आणि योग्य पाठिंबा मिळाल्यास, ग्रामीण भारताचं शिक्षणाचं भवितव्य निश्चित उज्वल होईल.

प्रतिक्रिया 

   घनसावंगी तालुक्यातील बाचेगाव तर गुणवत्ता पूर्वक शाळा आहेच याबरोबरच रामगव्हाण, मासेगाव, चित्रवडगाव, कंडारी परतूर, साकळगाव या शाळेतही चांगली गुणवत्ता आहे. घनसावंगी मतदासंघांतील शाळा व शिक्षण विभागाच्या विविध समस्यांसाठी आमदार डॉ हिकमत उढाण यांच्या उपस्थितीत २४ एप्रिल रोजी मुख्यध्यापकाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे यात काही मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे.

- रवींद्र जोशी, गट शिक्षण अधिकारी घनसावंगी 




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या