घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
राज्य सरकारने शालेय शिक्षण क्षेत्रात एक नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी ड्रेसकोड (गणवेश) अनिवार्य करण्यात येणार आहे. ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज १८ एप्रिल रोजी माळेगांव येथे दिली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली.
दादा भुसे म्हणाले, “शिक्षक हे समाजातील आदर्श व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व असतात. त्यांच्या कामकाजात व्यावसायिकता, एकरूपता आणि शिस्त टिकवण्यासाठी ड्रेसकोड गरजेचा आहे. शिक्षकांची एकसंध ओळख निर्माण व्हावी, त्यांच्या भूमिकेचा आदर वाढावा आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही शिस्तीची भावना निर्माण व्हावी, यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.”
राज्य सरकार या योजनेसाठी आवश्यक तो निधी पुरविणार असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केले. “शिक्षकांवर कोणताही आर्थिक बोजा न येता शासनाकडून गणवेशासाठी आवश्यक निधी दिला जाईल. त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
शिक्षक ड्रेसकोडच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अधिकृत मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जाहीर केल्या जातील. त्यामध्ये गणवेशाचा रंग, प्रकार, वापरण्याचे दिवस, तसेच इतर तांत्रिक बाबींचा समावेश असेल. हा ड्रेसकोड दररोज वापरण्याचा असेल की ठराविक दिवशी, यावरही स्पष्टता दिली जाणार आहे.
ड्रेसकोड लागू करण्यापूर्वी विविध शिक्षक संघटनांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा विचार केला जाणार आहे. “या निर्णयाची अंमलबजावणी करताना शिक्षक संघटनांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या धोरणावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत केली जाईल,” असे भुसे यांनी नमूद केले.
ड्रेसकोडमुळे शिक्षण क्षेत्रात शिस्तीचे वातावरण निर्माण होईल, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. सध्या विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या पोशाखात मोठ्या प्रमाणावर वैविध्य दिसून येते, त्यामुळे एकसंधता साधणे कठीण जाते. यामुळेच सर्व शिक्षकांसाठी समान गणवेश अनिवार्य करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांमध्येही एक सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या शिस्तबद्धतेत वाढ होईल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेसंबंध अधिक विश्वासपूर्ण बनतील, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या घोषणेनंतर राज्यातील शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते, याकडे संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment