माळेगाव साखर कारखान्याची एकरकमी Frp देण्यात आघाडी: इतर कारखानदार आघाडी घेणार का

 प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     पुणे जिल्ह्यातील माळेगाव साखर कारखाना प्रशासनाने १ ते १५ मार्च या कालावधीत गाळप केलेल्या उसाचे बिल प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकरकमी वर्ग केले आहे. अशी माहिती हाती येतेय ही रक्कम एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) पेक्षा अधिक असून, माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात प्रथमच एकरकमी एफआरपी लागू करणारा कारखाना ठरला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील माळेगाव संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे. या निर्णयामुळे इतर साखर कारखानदारही आता एकरकमी एफआरपी लागू करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि माळेगावची पुढाकार

    मुंबई उच्च न्यायालयाने एफआरपी एकरकमी देण्याचे आदेश दिल्यानंतर माळेगाव साखर कारखान्याने त्वरित पावले उचलून, राज्यातील पहिली पायरी म्हणून प्रतिटन ३१३२ रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. माळेगावच्या अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण आणि संचालक मंडळाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.


राज्यातील ऊस उत्पादकांसाठी आदर्श पायरी

    मागील हंगामात माळेगाव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ३६३६ रुपये प्रतिटन अंतिम ऊस दर दिला होता. चालू हंगामातही प्रतिटन ३१३२ रुपये सर्वाधिक अॅडव्हान्स एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त दिलासा म्हणून जून-जुलैमध्ये प्रतिटन २०० रुपये खोडकी पेमेंट देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. यासोबतच कारखान्याने साखर कामगारांसाठी विक्रमी बोनस आणि इतर आर्थिक सुविधा पुरवल्या आहेत.

गळीत हंगामाचा यशस्वी समारोप आणि विक्रमी उत्पादन

    या वर्षी माळेगाव साखर कारखान्याने सुमारे १३० दिवस गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडला आहे. ११ लाख २५ हजार टन ऊसाचे गाळप झाले असून, त्यापैकी गेटकेनधारकांनी ३ लाख ३६ हजार ८२४ टन ऊसाचा पुरवठा केला आहे. या हंगामात ११ लाख ८१ हजार ७०० साखर पोती तयार झाली आहेत. त्याचप्रमाणे, ८ कोटी ५४ लाख युनिट विजेचे उत्पादन व इथेनॉलचे विक्रमी उत्पन्न मिळविण्यात आले आहे.


उत्कृष्ट आर्थिक नियोजन

    माळेगाव साखर कारखान्याच्या आर्थिक नियोजनातही उल्लेखनीय प्रगती झाली आहे. मागील संचालक मंडळाने घेतलेल्या मध्यम मुदतीच्या कर्जाची परतफेड पाच वर्षांत ९६ कोटी ६० लाख रुपये केली आहे, तसेच ८५ कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे. व्हीएसआय संस्थेने माळेगाव कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक नियोजनाचा पुरस्कार दिला आहे.


विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर

   विरोधकांनी माळेगाव साखर कारखान्यावर टीका केली असली, तरी कारखान्याच्या आर्थिक स्थिरतेची आणि यशस्वी कामगिरीची खात्री असल्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी स्पष्ट केले आहे.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!