बीडमध्ये मशिदीमध्ये स्फोट, ईद सणाला गालबोट

गेवराई तालुक्यातील दुर्दैवी घटना



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


    दि २९ मार्च रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धामसाला गावातील मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमझान महिन्यातील या स्फोटाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका माथेफिरूने हा स्फोट घडवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, मात्र स्फोटामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे.

   या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु मशिदीच्या इमारतीला काही प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः मशिदीतील फरशी फुटली असून, स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

पोलीसांची तत्पर कारवाई

    बीड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पहाटेपासून आरोपींचा शोध चालू आहे. आरोपींवर तलवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, स्फोटकं कुठून आली आणि आरोपीचा नेमका हेतू काय होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

    बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांची मालिका: मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडेच केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.


स्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

    या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन व पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे. ईद सणाच्या तोंडावर अशा प्रकारची घटना घडल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.

  बीडमधील नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!