संगणक आणि प्रिंटर जोगलादेवी बंधाऱ्यात फेकले

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
स्नेहश्री मल्टीस्टेट बँक, अंबड येथे झालेल्या चोरी आणि फसवणूक प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास करून तीन आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी जगन्नाथ गणेश तिकांडे (वय ३३, रा. शेवगा, ता. अंबड, जि. जालना) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी बँकेत कर्ज घेण्यासाठी काही कोरे चेक बँकेच्या मॅनेजर सुनिल बाप्पासाहेब कुढेकर यांच्याकडे दिले होते. कर्जाची परतफेड केल्यानंतर फिर्यादीने चेक परत मागितले असता बँकेने ते नाकारले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, बँकेच्या मॅनेजरने इतर आरोपींसोबत संगणमत करून बनावट आधारकार्डच्या मदतीने फिर्यादीच्या खात्यातून ६५ हजार रुपये चेकद्वारे काढून फसवणूक केली. यावरून पोलीस ठाणे अंबड येथे गु.र.क्र. 154/2025, भा. न्या. सं. अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून मॅनेजर सुनिल कुढेकर यास ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली असता, त्याने इतर आरोपी १) आदर्श आनंद मस्के (वय २१, रा. बनगाव, ता. अंबड) २) प्रशांत प्रकाश बरडे (वय २०, रा. शारदा नगर, अंबड) आणि ३) शुभम कांता सोनवणे (रा. इंदलगाव, ता. घनसावंगी) यांच्या मदतीने स्नेहश्री बँक, जालना रोड येथे चोरी करून बँकेतील पाच संगणक, एक प्रिंटर, कर्जदारांच्या ८०० फाईल्स आणि ५००० कोरे चेक चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून फिर्यादीचे ६५ हजार रुपये आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान, चोरी केलेल्या कर्ज फाईल्स आणि चेक यापैकी काही आरोपींच्या घरी सापडले, तर उर्वरित फाईल्स व चेक आदर्श मस्के यांनी त्यांच्या शेतात जाळून टाकल्याचे निष्पन्न झाले. फाईल्सच्या क्लीप्स आणि इतर पुरावे शेतात सापडले.
याशिवाय, आरोपींनी चोरी केलेले संगणक आणि प्रिंटर जोगलादेवी बंधाऱ्यात फेकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने बंधाऱ्यातून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. तपासादरम्यान, बनावट आधार कार्ड तयार करण्यासाठी वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले.
या सर्व आरोपींना दिनांक २५ मार्च रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर तपासकाम अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक जालना; अयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक जालना; विशाल कृष्णा खांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड; सिध्दार्थ बारवाल, परि. पोलीस अधीक्षक, अंबड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अमोल गुरले, पो.हे.कॉ विष्णु चव्हाण, दिपक पाटील, सागर बाविस्कर, पो.कॉ. स्वप्निल भिसे, अरुण मुंडे, अशोक भांगळ आणि होमगार्ड राजेश शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
Comments
Post a Comment