जालना - शेतकऱ्याचे अपहरण करून २५ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या ५ दरोडेखोरांना केले जेरबंद
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
शेतकऱ्याच्या अपहरणानंतर २५ लाख रुपये खंडणी मागणाऱ्या ५ दरोडेखोरांना मौजपुरी (जालना) पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शेतकरी निवृत्ती तांगडे यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २३ मार्च रोजी रात्री त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून १५००० रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली होती व २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
अपहरणाचा थरार
२२ मार्चच्या रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास शेतकरी निवृत्ती तांगडे हे त्यांच्या राहत्या घराबाहेर झोपलेले असताना ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना गाडीत कोंबले. त्यानंतर जालना-मंठा हायवेवरून त्यांना एका ठिकाणी घेऊन जाऊन, त्यांच्याकडील १५००० रुपये काढून घेतले. त्यांनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली, जी देण्याचे तांगडे यांनी मान्य केल्यामुळे रात्री त्यांना घोडेगाव फाट्यावर सोडून देण्यात आले. परंतु, दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता पुन्हा फोनवर धमकी देऊन खंडणीची मागणी करण्यात आली.
पोलीस तपासाची यशस्वी कामगिरी
फिर्यादीच्या तक्रारीनंतर मौजपुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासादरम्यान डुकरी पिंपरी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांगडे यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार स्कार्पिओ गाडीची ओळख पटली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपींच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली.
आरोपींची अटक
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश तात्याराव श्रीखंडे, रामप्रसाद ऊर्फ बाळू शिंदे, आकाश अशोक घुले, विशाल ऊर्फ गजानन डोंगरे, आणि आकाश तुकाराम रंधवे या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून अपहरणात वापरलेले स्कार्पिओ वाहन, मोबाईल आणि ९.८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींची नावे
1. गणेश तात्याराव श्रीखंडे (रा. सावरगाव हडप, जालना)
2. रामप्रसाद ऊर्फ बाळू डिगांबर शिंदे (रा. सावरगाव हडप, जालना)
3. आकाश अशोक घुले (रा. नेवासा फाटा, अहिल्यानगर)
4. विशाल ऊर्फ गजानन डोंगरे (रा. सावरगाव हडप, जालना)
5. आकाश तुकाराम रंधवे (रा. हडप, जालना)
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी या गुन्ह्यात अनिकेत गोरख उकांडे व शाम चव्हाण यांची मदत घेतल्याचे मान्य केले आहे. या दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
अधिक तपास चालू
या प्रकरणात पकडलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरी
या प्रकरणाच्या तपासात पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मौजपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व त्यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी केली.
टीम सदस्य
सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी, चंद्रकांत पवार, ज्ञानोबा बिरादार, मच्छिद्र वाघ, दिलीप गोडबोले, नितीन खरात, राजेंद्र देशमुख, भास्कर वाघ, सतिष गोफणे, नितीन कोकणे, प्रदीप पाचरणे, अविनाश मांटे आणि धोंडीराम वाघमारे.
Comments
Post a Comment