घनसावंगी: गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यावरून आजी माजी आमदाराची श्रेयवादाची लढाई
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यावरून सध्याचे आमदार हिकमत उढाण आणि माजी आमदार राजेश टोपे यांच्यात श्रेयवादाची लढाई पेटली आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपले योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
गोदावरी नदीकाठच्या गावांना दिलासा – जायकवाडी धरणातून २ एप्रिल रोजी पाणी सोडणार
अंबड व घनसावंगी तालुक्यातील गावांमध्ये वाढत्या पाणीटंचाईमुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. या परिस्थितीत ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीला यश मिळाले असून, बुधवार, दिनांक २ एप्रिल रोजी जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींचा लढा यशस्वी
अंबड व घनसावंगी तालुक्यातील बळेगाव, आपेगाव, साष्ट पिंपळगाव, डोमलगाव, गोरी, गंधारी, शहागड, वाळकेश्वर, कुरण, पाथरवाला बु., गोंदी, हसनापूर, कोठाळा, साडेगाव, गंगाचिंचोली, इंदलगाव, घुंगर्डे हदगाव, भांबेरी, दह्याळा, चंदनापुरी खु., रेणापूरी, चंदनापुरी बु., नालेवाडी, अंतरवाली सराटी, महाकाळा, जोगलादेवी, रामसगाव, शेवता, राजाटाकळी, शिवणगाव, उक्कडगाव, भादली, गुंज बु., मुद्रेगाव आणि भायगव्हाण या गावांच्या ग्रामपंचायतींनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. शेवटी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रेयवादाची लढाई पेटली
माजी आमदार राजेश टोपे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या निर्णयाचे श्रेय घेतले. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी गावकऱ्यांच्या संघर्षाची आणि प्रशासनाकडे पाठपुराव्याची माहिती दिली.
परंतु, सध्याचे आमदार हिकमत उढाण यांनी यावर प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, "गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्याबाबत माजी आमदारांची पोस्ट वाचली. सोबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लिहिलेले पत्र जोडले आहे. खोटे श्रेय घेण्याची धडपड बघून कीव आली.असे म्हटले आहे"
त्यांनी स्पष्ट केले की, "गोदावरी पात्रात पाणी सोडण्याची एक कायदेशीर प्रक्रिया असते आणि ती पूर्ण केल्यानंतरच पाणी सोडले जाते. आम्ही कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प यांना विनंती केली, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून किती पाणी लागेल याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवायला लावला, तसेच अधीक्षक अभियंता यांची मंजुरी मिळवण्यासाठीही प्रयत्न केले."
गावकऱ्यांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन
प्रशासनाने गावकरी आणि शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाण्याचा वापर करावा. जायकवाडी धरणातून सोडण्यात येणारे पाणी नागरिकांसह जनावरांच्या पिण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
नदी पात्रात पाणी सोडण्यावरून राजकीय संघर्ष
या संपूर्ण घटनेत माजी आमदार राजेश टोपे आणि सध्याचे आमदार डॉ हिकमत उढाण यांच्यात श्रेयवादावरून संघर्ष निर्माण झाला आहे. एका बाजूला माजी आमदारांनी या निर्णयाचे श्रेय घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या आमदारांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच पाणी सोडण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गोदावरी पात्रात पाणी सोडण्याच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
Waril yadit kuran grampanchyat naw aahe te Khote aahe aaj hi kuran Swatantra gram panchayat nahi dattatray kurankar eak. Nagrik kuran
ReplyDelete