बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने माजवले थैमान
शेतकऱ्यांचे नुकसान
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
३१ मार्च, सोमवार रोजी दुपार ते सायंकाळी बीड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूममध्ये जोरदार पाऊस झाला, तर घनसावंगी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागली. काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या.
धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी व घनसावंगी तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील तीर्थपुरी, खापरदेव हिवरा येथे जोरदार पाऊस झाला, तर शिंदे वडगाव येथे रिमझिम पावसाची नोंद झाली. एकलहेरा, पिठोरी सिरसगाव, आंतरवाली टेंभी, बाचेगाव, देवडी हादगाव, पाडोळी बुद्रुक येथेही पावसाने हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा मिळाला, मात्र पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बीड तालुक्यातील पाली, कोळवाडी, मांजरसुंबा परिसरातही अवकाळी पावसाने थैमान घातले. काही भागांत गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि इतर पिकांवर पावसाचा फटका बसला असून, शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिके ओलसर झाल्याने गंज लागण्याची शक्यता आहे. याशिवाय, फळबागांवरही पावसाचा विपरीत परिणाम झाला असून, आंबा, डाळिंब, केळी यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा अवकाळी पाऊस अधिक त्रासदायक ठरत आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment