तीन वर्षाच्या मुलींचा शोध लागत नसल्यामुळे अंबड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा
तीन वर्षाच्या मुलींचा शोध लागत नसल्यामुळे अंबड तहसील कार्यालयावर मूक मोर्चा
अंबड शहरातील फैसलाबाद कॉलनीत १२ जानेवारी रोजी, रविवारी, शेख अमजद हाजी यांची तीन वर्षांची मुलगी इकरा घराबाहेर खेळण्यासाठी गेली, मात्र ती अद्याप घरी परतली नाही. तिच्या बेपत्ताबद्दल कुटुंबियांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी, पोलिसांना तिचा शोध लावण्यात अद्याप यश आलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
आज, ३१ जानेवारी रोजी, अंबड तहसील कार्यालयावर एक शांततापूर्ण मुक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरातील सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे इकराचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व शेख अमजद हाजी यांच्या कुटुंबाने केले, तर अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. मोर्चा शांततेत पार पडला, मात्र नागरिकांनी शासन आणि पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी ठाम भूमिका घेतली.
मोर्चाच्या शेवटी अंबड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यात पोलिसांनी इकराच्या शोधासाठी अधिक चोख तपास करावा आणि कुटुंबाला न्याय मिळावा, याची मागणी करण्यात आली. इकराच्या हरवण्याची घटना शहरात संवेदनशीलतेने पाहिली जात असून, तिच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन, लवकरच तपासाची प्रगती होईल आणि इकराला सुखरूप घरी आणले जाईल, अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment