जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित, सरकारने काही मागण्या मान्य केल्याने तात्पुरती शांतता

 जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित, सरकारने काही मागण्या मान्य केल्याने तात्पुरती शांतता



  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली येथे सुरु असलेल्या सामूहिक आमरण उपोषणाला आज दि ३० जानेवारी रोजी सहावा दिवस होता. या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी सरकारकडून काही मागण्या मान्य झाल्यानंतर, तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी चार मागण्या मान्य केल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात आंदोलकांनी पुढील कृतीबाबत देखील स्पष्टता दिली आहे. मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन पुन्हा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.



मान्य झालेल्या मागण्या

१. कुणबी नोंदी शोधण्यासाठी समितीला मुदतवाढ: न्या. शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या नोंदी शोधण्याचे काम सुरू राहणार आहे.

२. हैद्राबाद गॅझेटिअर तपासणी: हैद्राबाद गॅझेटिअरच्या तपासणीसाठी न्या. शिंदे समितीकडून अहवाल मागवण्यात येईल आणि त्यावर उचित कार्यवाही केली जाईल.

३. गुन्हे मागे घेण्याचा निर्णय: मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

४. कुणबी प्रमाणपत्र वितरण सुलभ करण्यासाठी कक्ष कार्यरत: कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेले कक्ष पुन्हा सुरु करून त्यांना गती दिली जाणार आहे.



प्रलंबित व पुरवणी मागण्या

याशिवाय, काही मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. आंदोलकांनी या मागण्यांवर अजूनही ठाम भूमिका घेतली असून सरकारकडून त्यांची पूर्तता करण्याची अपेक्षा आहे. या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

१. न्या. शिंदे समितीचे मंत्रालयातील बंद झालेले कार्यालय तात्काळ सुरु करावे. 

२. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किचकट अटी सोप्या कराव्यात व जातीय भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 

३. वंशावळ जुळवणारी समिती पुन्हा कार्यान्वित करावी, तसेच मोडी लिपी अभ्यासकांचे वेतन पुन्हा सुरू करावे. 

४. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट माघे घ्यावेत.

५. बाँबे, सातारा आणि औंध गॅझेटिअर देखील लागू करावेत. 

६. EWS प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत याची हमी द्यावी. 

७. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी. 

८. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी त्वरित करावी.


आंदोलनाची पुढील दिशा

 सध्या आंदोलन स्थगित केले असले तरी आंदोलकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन अधिक तीव्र आणि व्यापक होईल. सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनकर्ते कोट्यवधी लोकांसह मुंबईकडे मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.


आंतरवलीतील उपोषण स्थगित केल्यानंतरही मराठा समाजाच्या मागण्यांवर पुढील हालचालींवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!