कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार”
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा “सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार” प्रदान
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित "कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना" यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या शिखर संशोधन संस्थेकडून "सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार" देण्यात आला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ साठी दिला गेलेला हा पुरस्कार कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणी भूमिका आणि पर्यावरण कटिबद्धतेचा सन्मान आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी पद्मविभूषण खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते समर्थ उद्योग समूहाचे मार्गदर्शक राजेश टोपे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक अमरसिंह खरात, भागवत कटारे, सुधाकर खरात, नरसिंगराव मुंढे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याच्या यशस्वी वाटचालीत काही प्रमुख घटकांचा समावेश आहे:
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर: उत्पादन प्रक्रिया सुधारण्यासाठी कारखान्याने स्वयंचलित यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढली असून उत्पादन खर्चात लक्षणीय घट झाली आहे.
ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन: कारखान्याने ऊर्जा बचतीसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये एनर्जी एफिशिएंट मोटर्स, पंपांचा वापर आणि पर्यावरणपूरक इन्सीनरेशन तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी उपक्रम: उसाच्या लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, खतांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन आणि उन्हाळी पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले आहे.
सामाजिक जबाबदारी: कारखाना सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या पुरस्काराने समर्थ साखर कारखान्याच्या उद्योग क्षेत्रातील योगदानाला आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या योगदानाला मान्यता मिळाली आहे, ज्यामुळे संपूर्ण समर्थ उद्योग समूहासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
Comments
Post a Comment