जालन्यातील चार महिन्यापूर्वी अपहरण झालेला ७ वर्षाचा बालक दिल्लीत सापडला.!
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील चार महिन्यापूर्वी पाला'वरून अपहरण झालेला ७ वर्षाचा बालक दिल्लीत सापडला आहे अंबड पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नांना अखेर यश आलेय अंबड पोलिसांचे पथक बालकाला सोबत घेऊन दिल्लीहून जालन्याकडे रवाना झाले आहे
अंबड तालुक्यातील रवना -पराडा दर्ग्याजवळच असलेल्या गोंधळवाडी येथील पारधी वस्तीवरील पालावरून चार महिन्यांपूर्वी जुलै २०२४ मध्ये सोमनाथ वनेश शिंदे हा ७ वर्षाचा मुलगा अचानक गायब झाला होता.सदर मुलाचा नातेवाईकांनी परिसरातील पारधी समाजाच्या वस्त्त्यांसह जिल्ह्यात सर्वत्र शोध घेतला होता, मात्र तो सापडत नव्हता.
याप्रकरणात अंबड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून, आई-वडिलांपासून पारखे झालेल्या या मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरविली. अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे आणि पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी पोलीस हवालदार विष्णू चव्हाण यांच्यासह एक पथक स्थापन केले संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यात सर्व पोलिसांना या मुलाच्या छायाचित्रांसह माहिती कळवून अशा वर्णनाचा मुलगा सापडल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
आई-वडीलासह पालावर राहत असल्याने आणि एका ठिकाणी कायम वास्तव्य नसल्याने या मुलाचे आधारकार्ड बनविण्यात आलेले नव्हते, त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. चार महिन्यापासून या मुलाच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकात एक मुलगा दीड महिन्यांपूर्वी बेशुद्धावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली येथील बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून, त्या मुलाची माहिती घेत त्याचे छायाचित्र मागवून घेतले असता, तो सोमनाथ हाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, पोलीस अंमलदार हिरामण फलटणकर यांनी सोमनाथच्या मामा आणि मामीला सोबत घेऊन काल दिल्ली गाठली.
दिल्ली येथील न्यायालयात कायदेशीर ताबा घेण्यासाठी पोलीस पथक गेले असतांना बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांच्या वाहनातून आलेल्या सोमनाथने पळत येऊन मामाला मिठ्ठी मारताच त्याठिकाणी असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांना अक्षरशः गहिवरून आले. दीड महिन्यांपूर्वी सोमनाथ हा दिल्लीत निजामुद्दीन रेल्वेस्थानकात बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्याला बालकल्याण समितीने सामाजिक संस्थांच्या मदतीने एका रुग्णालयात दाखल केले होते. सोमनाथ याच्यावर तब्बल ८ दिवस आयसीयूमध्ये उपचार केल्यानंतर जवळपास दिडमहिना त्याच्यावर त्याच रुग्णालयात साधारण वार्डात उपचार सुरू होते, अशी माहिती बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सोमनाथच्या मदतीसाठी देवासारखे धावून आलेले दिल्ली येथील बालकल्याण समितीच्या प्रीती गुप्ता, त्यांचे अधिकारी आणि अंबड पोलिसांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे चार महिन्यापासून आई-वडीलापासून दुरावलेल्या सोमनाथला अखेर आपले मायेचं छत्र मिळालं आहे.
सोमनाथ यास दिल्लीहून घेऊन पोलीस पथक रेल्वेने जालनाकडे रवाना झाले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस आयुष नोपाणी, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस हवालदार विष्णू चव्हाण, पोना. हिरामण फलटणकर यांनी ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, सोमनाथ हा दिल्लीपर्यंत कसा पोहोचला..? त्याचे अपहरण झाले की तो गायब झाला..? हे तो सध्या अत्यंत भांबावलेल्या अवस्थेत असल्याने त्याला नीट सांगता येत नाही.
Comments
Post a Comment