वीज कोसळून १६ जनावरांचा मृत्यू..! तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी
काल रवीवारी वीजेच्या प्रचंड कडकडाटासह पाऊस झालाय यात वीज कोसळून पैठण तालुक्यात पंधरा जनावरांचा तर अंबड तालुक्यात एका जनावराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या विजेमुळे तीन शेतकऱ्यांसह एक महिला किरकोळ जखमी झालेत.
पैठण तालुक्यात विहामांडवा सालवडगाव शिवारात वीज कोसळून १५ जनावरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास घडलीय वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.
रविवारी दुपारी पैठण तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विहामांडवा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊन जानकाबाई शकील चव्हाण (रा. सालवडगाव) यांच्या शेती वस्तीवरील गट नंबर ५४५ येथे वीज पडून गाभण असलेल्या ६ मेंढ्या एका कोकरुचा मृत्यू झाला. यासह सालवडगाव येथे मोमीन चव्हाण यांच्या वस्तीवरील ७ मेंढ्या व नानेगाव येथील शेतकरी विष्णू माने यांच्या एका म्हशीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण यांनी संबंधित गावाच्या तलाठ्यांना पंचनामा करण्याचा आदेश दिला. नियमानुसार वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली आहे.
तर अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. परिसरातील करंजाळा येथे वीज कोसळून एक बैल दगावला तर तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी झाली आहे.
रविवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट सुरू होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वडीगोद्री परिसरातील करंजळा, अंतरवाली सराटी आदी भागात वादळी वारे व मेघगर्जने सह एक तास पाऊस झाला. करंजळा येथील गजानन काकासाहेब नांद्रे यांच्या गट नं १५१ मधील शेतात बैलगाडी ला बांधलेल्या बैलावर वीज पडून एक बैल दगावला. याचवेळी शेतात भूस भरत असलेले शेतकरी ज्ञानेश्वर नांद्रे,दीपक नांद्रे, ऋषी नांद्रे व सुलभा मिरकड या किरकोळ जखमी झाल्या. दुसरा बैल सुदैवाने वाचला. या मृत जनावरांची नुकसान भरपाई शासनाचे लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.
Comments
Post a Comment