जालना जिल्ह्यात ड्रोन सदृश्य वस्तूंची हालचाल; नागरिकांना घाबरू नये-पोलीस विभागाचे आवाहन
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
आज ९ मे रोजी जालना जिल्ह्यात काही भागांमध्ये आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्याची नोंद झाली आहे. या संदर्भात नागरिकांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्पष्ट केले आहे की, या संदर्भात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
"या बाबतची माहिती संवेदनशील असल्याने यावर सविस्तर भाष्य करता येणार नाही. मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये," असेही त्यांनी सांगितले.
सदर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने संबंधित व्हिडिओ आणि घटनांची चौकशी सुरू केली आहे. कोणतीही अधिकृत माहिती येईपर्यंत अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत सांगितले, "सर्व माहितीची खातरजमा केली जात आहे. नागरिकांनी घाबरू नये आणि कोणत्याही असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये."
जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग यावर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अशा घटनांबाबत कोणतीही पुष्टी न झालेल्या बातम्या पसरवू नयेत, असेही प्रशासनाने बजावले आहे.
Comments
Post a Comment