अंबड तहसीलदारांची मोठी कारवाई- ३१ वाळू तस्करांवर गुन्हे दाखल, १ कोटींचा महसूल बुडवला

 वाळकेश्वर व शहागड परिसरात महसूल विभागाची धाड: ट्रॅक्टरसह वाहने व मोबाईल जप्त


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   अंबड तालुक्यातील शहागड परिसरातील गोदावरी नदीपात्रातून अंदाजे २०० ब्रास वाळू चोरी गेल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात तहसीलदार विजय चव्हाण यांच्या आदेशानुसार महसूल विभागाने ३१ वाळू तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करत भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ व १४४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या वाळू चोऱ्येमुळे शासनाचा सुमारे १ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे उघड झाले आहे.

   २९ एप्रिल रोजी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी शहागड व आपेगाव यांनी गावातील पंचांनामा घेऊन गोदावरी नदीपात्राची पाहणी करून पंचनामा केला. पाहणी दरम्यान जुन्या पुलाजवळ, महादेव मंदिराजवळ आणि समर्थ कारखान्याच्या पाणीपुरवठा ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उत्खनन केल्याचे निदर्शनास आले.

    २४ एप्रिलपासून नदीपात्रात संचारबंदी लागू असूनही रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, लोडर व हायवा ट्रकच्या साहाय्याने वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळले. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच गुप्तचर खात्याच्या तपासणीतून या प्रकाराची खातरजमा झाली.

    तलाठी सजा शहागड यांनी दिलेल्या अहवालात व पंचनाम्यात ३१ वाळू तस्करांची नावे स्पष्टपणे नमूद आहेत. या सर्व आरोपींनी स्वतःच्या मालकीची वाहने (ट्रॅक्टर, लोडर, हायवा ट्रक, जेसीबी) वापरून गोदावरी नदीपात्रातून वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे महसूल विभागाने भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ व १४४ च्या उल्लंघनाबरोबरच पर्यावरण संरक्षण कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व कलम ७ व ८ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

    तसेच, तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले की, दोषी आढळलेल्या सर्वांची स्थायी मालमत्तेवर जप्तीचा बोजा टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. संबंधितांना २४ तासांच्या आत तहसील कार्यालयात उपस्थित राहून लेखी खुलासा सादर करण्याची नोटीस देण्यात आली आहे. जर विहित मुदतीत खुलासा प्राप्त झाला नाही तर, शासनाच्या प्रचलित नियमानुसार व एम.एल.आर.सी कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाळकेश्वर व शहागड परिसरात महसूल विभागाची धाड: ट्रॅक्टरसह वाहने व मोबाईल जप्त

    आज ८ मे गुरूवार रोजी पहाटेच्या सुमारास मौजे वाळकेश्वर व शहागड परिसरात महसूल पथकाने अचानक धाड टाकली. धाडीत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, पथकाचे लोकेशन समजल्याने इतर अवैध वाहने घटनास्थळावरून पसार झाली.

   या कारवाईदरम्यान लोकेशन पुरवणाऱ्या आठ व्यक्तींची ओळख पटवण्यात आली असून, त्यांच्याकडून नऊ भ्रमणध्वनी (मोबाईल फोन), चार चारचाकी कार आणि दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे अशी माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!