जालना-पोहायला गेलेल्या दोन बालकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
नदीकाठी खेळात असताना पोहायला गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील निमखेडा बुद्रुक परिसरात गुरुवारी दुपारी पूर्णा नदीत पोहायला गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत बालकांची नावे उमेश दादाराव कासारे (वय १०) आणि प्रेम ज्ञानेश्वर घोरपडे (वय ८) अशी आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उमेश आणि प्रेम हे दुपारच्या सुमारास गावाजवळील पूर्णा नदीकाठी खेळत होते. खेळता खेळता ते दोघे नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. परिसरातील काही ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. काही वेळानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
या दुर्दैवी घटनेने निमखेडा बुद्रुक गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांनी त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला आहे. गावातील वातावरण गहिवरून गेले असून, प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले.
या घटनेबाबत स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कडक उन्हाळ्यामुळे नदी, कालवे, शेततळी याठिकाणी पोहण्यासाठी जाणाऱ्या बालकांनी आणि युवकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
तसेच पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि नदीसारख्या धोकादायक ठिकाणी पोहायला जाण्यापासून प्रतिबंध करावा किंवा आपण सोबत जावे, असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी गाव पातळीवर जनजागृती करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment