घनसावंगी-ग्रामस्थांनी चोरटे पकडले; संतप्त ग्रामस्थांनी स्विफ्ट कारची केली प्रचंड तोडफोड

 घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील प्रकार, तीर्थपुरी पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण

   चोरीसाठी आलेल्या चोरट्यांना गावकऱ्यांनी मोठ्या धैर्याने पकडले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चोरट्यांच्या स्विफ्ट कारची जोरदार तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदरील घटना घनसावंगी तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथे घडलीय.

      सिद्धेश्वर पिंपळगाव येथील गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ ते ५ मेच्या रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास, स्विफ्ट कार (क्रमांक MH 48 P 0238) मधून पाच चोरटे चोरीच्या उद्देशाने आले होते. कारमध्ये ड्रायव्हर थांबून राहिला, तर पाच जण गावात फीरत होते. सतर्क ग्रामस्थांच्या नजरेतून त्यांच्या हालचाली वाचल्या नाहीत. गावात 'चोर चोर' अशी आरडाओरड होताच चोरट्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.

    ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून कारमध्ये थांबलेल्या ड्रायव्हरला पकडले आणि चौकशी केली. चौकशीत तो खोटं बोलत असल्याचे उघड झाले. काही चोरटे शेतवस्तीतील आखाड्यांमध्ये लपले होते. ही घटना वाऱ्यासारखी पसरली सिद्धेश्वर पिंपळगाव  व परिसरातील गावकऱ्यांनी पाठलाग करत अंबड-खापरदेव-हिवरा रोडवर दोन चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले. यावेळी घटनास्थळी पोलिसही उपस्थित झाले अशी माहिती मिळाली.

घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पकडलेल्या ड्रायव्हरसह दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. 



पूर्वीच्या दरोड्याशी संबंधाची शक्यता

   खापरदेव-हिवरा येथे काल शेतवस्तीवर दरोडा टाकून पती-पत्नीला मारहाण केली होती. अटक करण्यात आलेल्या चोरट्यांचा त्या दरोड्याशी काही संबंध आहे का, याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. पिंपरखेड येथेही दोन वेळा जबरी चोरीच्या घटना घडल्या असून, त्यांचा तपास अद्याप अपूर्ण असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले.


तीर्थपुरी पोलिसांवर संतापाचा उद्रेक

    सिद्धेश्वर पिंपळगावच्या घटनेनंतर तीर्थपुरी पोलिसांवर निष्क्रियतेचे गंभीर आरोप होत आहेत. परिसरात वाढत चाललेल्या चोरी व अवैध धंद्यांवर पोलिस कडक कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे तीर्थपुरी पोलीस ठाण्यात तत्काळ कर्तव्यदक्ष व कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.

दुचाकी चोराला पोलिसांनी सोडले प्रकरणही चर्चेत

   २९ मार्च रोजी तीर्थपुरी-रामसगाव रोडवर दिवसाढवळ्या शेतकऱ्याची दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणारा चोरटा भोगलगाव येथे पकडण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला नाही व त्याला सोडून दिले. याबाबत विचारणा केली असता त्याला ग्रामस्थांनी पकडताना मारहाण केली असे समजले. हा चोर बीड जिल्ह्यातील होता त्याच्यावर आधीही तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.


प्रतिक्रिया

    खापरदेव हिवरा येथे अत्यंत गरीब आणि मुस्लिम समाजातील पती- पत्नीवर अमानुष मारहाण करत हल्ला झाला आहे. याआधीही खापरदेव-हिवरा येथे चोरी झाली असून अजूनही पोलिसांना तपास लागलेला नाही. प्रशासनाने जागे होण्यासाठी एखाद्याचा प्राण जाण्याची वाट पाहात आहे की का? या घटनेमुळे गाव भयभीत झालं असून पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

- भारत परदेशी, ग्रामस्थ खा हिवरा 


प्रतिक्रिया 

   सिद्धेश्वर पिंपळगाव प्रकरणात पोलिसांनी पकडलेल्या ड्रायव्हरसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात असून पाचही चोरट्यांपैकी एक जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील, एक भोकरदन तालुक्यातील, एक गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील आणि दोन घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ गावचे आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

- प्रतिभा पठाडे, पोलीस उपनिरीक्षक तीर्थपुरी


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!