घनसावंगी - नाल्यांच्या स्वच्छतेवरून संतापाचा स्फोट; ग्रामपंचायत कार्यालयाला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
गावात पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता न झाल्यामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून गावकऱ्यांनी १३ मे मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून जोरदार आंदोलन केले. ही घटना घनसावंगी तालुक्यातील गुरुपिंप्री येथे घडलीय. "नाले साफ करा, गाव वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रीयतेविरोधात गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
गावकऱ्यांनी सांगितले की, दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचतो. यामुळे गावातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रहदारी अडथळ्यात येते आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. यंदा पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना देखील नाल्यांची साफसफाई करण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.
ग्रामस्थांनी यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही ग्रामसेवकांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून त्यांनी सकाळपासूनच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर १३ मे मंगळवार रोजी ठिय्या आंदोलन करत कार्यालयाला कुलूप लावले.
यावेळी गावकरी म्हणाले, "आम्ही वेळेवर कर भरतो, मग सेवा का मिळू नये? प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल."
या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी ठाम भूमिका घेत कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment