जालना - वीज अंगावर पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
"विजांचा कडकडाट, मेघगर्जना, आणि क्षणात घडलेला जीवघेणा अपघात..."
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना तालुक्यातील भाटेपुरी गावात आज (सोमवारी) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. वीज अंगावर पडल्याने विठ्ठल गंगाराम कावळे (वय २५) या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती मिळाली.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल आपल्या शेतात रोजच्या प्रमाणे कामात व्यग्र होते. दुपारनंतर अचानक आकाश काळं-कुट्ट झालं, वाऱ्याचा वेग वाढला आणि विजांचा गर्जना सुरू झाला. त्याच दरम्यान, एक प्रचंड वीज अंगावर पडली आणि क्षणात विठ्ठल जमिनीवर कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली आणि गंभीर अवस्थेत त्यांना तत्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं.
तरुण वयातच विठ्ठल यांच्या अकाली जाण्याने भाटेपुरी गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील एकमेव आधारस्तंभ हरपल्याने आई-वडील, भावंडं व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकरीही अश्रू अनावर करून एकमेकांना धीर देताना दिसत आहेत.
विठ्ठल गंगाधर कावळे यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मदतीची मागणी होत आहे. त्याच्यावर सायंकाळी भाटेपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment