शेतकऱ्यांना कधी मिळणार पीक विमा व अतिवृष्टी अनुदान ? जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली माहिती
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार पीक विमा व अतिवृष्टी अनुदान
वर्ष सरत आले तरीही शेतकऱ्यांना अग्रीम विमाही नाही व अनुदानही नाही..
ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या बैठका
ओमप्रकाश उढाण
वर्ष संपत आले तरीही जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत पीक विमा आणि अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम विमा रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, डिसेंबर महिना संपत असताना अद्याप या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे गेले. शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारकडून या नुकसानीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले असून, याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. मात्र, अद्याप याद्या तयार करण्याचे आणि ऑनलाईन प्रक्रियांचे काम प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना अनुदानाच्या प्रतीक्षेत राहावे लागले आहे.
जालना जिल्ह्याचे जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी. इतके असून सन २०२४-२५ मध्ये ८१२.४ मिमी. इतका पाऊस पडलेला आहे व त्याधी सरासरीच्या तुलनेत १३४.९ टक्के इतकी आहे. जालना जिल्ह्याचे माहे सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १४१.८ मिमी. इतके असून सन २०२४-२५ मध्ये २२१६.९ मिमी. इतका पाऊस पडलेला आहे व त्याची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १६० १ टक्के इतकी आहे. माहे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद, फळपिकांचे असे एकूण २ लाख ५५ हजार ५१९.९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यानुसार २ लाख ८२ हजार ५३८ शेतकऱ्यांना ४१२.३० कोटी रक्कमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिली होती
अग्रिम पीकविम्याचे आश्वासनदेखील अद्याप पूर्ण झालेले नाही. कृषी विभागाच्या बैठकीत विम्यासह अनुदान वाटपाबाबत चर्चा झाली असली तरी त्याचे फलित शेतकऱ्यांना मिळालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे. नुकसानीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, जिल्हा कृषी अधिकारी गहिणीनाथ कापसे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रेतिषत मोघे यांच्या उपस्थिती कृषी विभागाची बैठक पार पडली. बैठकीस विविध बँकांचे प्रतिनिधी, विका कंपनीचे प्रतिनिधी, भुसार माल व फळबाग समन्वयक यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत पीककर्ज, पीकविमा, अतिवष्टी अनुदान, अग्रीम पीक विमा आदी मुद्द्द्यांवर चर्चा करण्यात आली होती.
यावर्षी खरिप हंगामात काही भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे, त्या शेतकऱ्यांना विम्याची २५% अग्रीम रक्कम दिवाळी पूर्वीशेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येईल. अतिवृष्टीच्या नुकसानी पोटी राज्य शासनाकडे ४१२ कोटीची मागणी करण्यात आली ती देखील पुढील महिन्याभरात मंडळातील गावानुसार मंजूर होईल. सदर नुकसान भरपाई दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत देण्यात आली होती मात्र डिसेंबर महिना संपत आला तरीही अग्रीम विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही हे विशेष!
जालना जिल्ह्यातही यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल सादर केला असला तरी अनुदान जमा करण्याची प्रक्रिया हळूगतीने सुरू आहे असे दिसून येते. व्ही.के. नंबर तयार करण्याची प्रक्रिया आणि डीबीटी प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम जमा करण्याचे काम कधी होणार? यासाठी अजून काही दिवस शेतकऱ्यांना थांबावे लागणार आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
शेतकरी वर्गाची आता एकच मागणी आहे की, शासनाने त्वरित विम्याची रक्कम आणि अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, जेणेकरून त्यांना पुढील शेती हंगामाची तयारी करता येईल.
प्रतिक्रिया
जालना जिल्हा भरातील अतिवृष्टीमुले नुकसान झालेल्या पिकांच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनी कडे केल्यात अशा शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून अग्रीम रक्कम वाटप होणार आहे. या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत दिनांक २७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हाधिकारी डॉ पांचाळ यांनी विमा कंपनींच्या अधिकाऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यांना ॲग्रीम पिक विमा रक्कम वर्ग करा अशा सूचना दिल्या आहेत. लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी कडून अग्रीम विमा रक्कम वर्ग होईल.
- जी.आर. कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना
प्रतिक्रिया
२०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीच्या अनुदानाच्या अनुषंगाने घनसावंगी तालुक्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीपासह शेतीपिके व फळबाग यांचे जे अतिवृष्टी मध्ये नुकसान झाले त्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम तहसील कार्यालयात चालू आहे.
- तहसीलदार योगिता खटावकर, घनसावंगी
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांच्या अग्रीम पिक विमा संदर्भात शुक्रवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालय मीटिंग संपन्न झाली त्या अनुषंगाने पिक विमा कंपनी कडून काम चालू असून घनसावंगी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत अशा ७९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी कडून काही दिवसात अग्रीम पिक विमा रक्कम जमा होईल
- तालुका कृषी अधिकारी एस. एन. पवळ, घनसावंगी
प्रतिक्रिया
जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाईचा शासन निर्णय होऊन देखील अद्याप पर्यंत जालना जिल्ह्यासह घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.यासाठी युवा शेतकरी संघर्ष समितीने सातत्याने कानठळी मोर्चा , विविध निवेदने, मोर्चे, आंदोलन करून याबाबतचा पाठपुरावा केला होता परंतु आचारसंहिता, निवडणुका आणि सरकार स्थापनेसाठी खूप वेळ गेला आता तरी ही मदत तातडीने मिळावी नसता संघर्ष समिती यासाठी पुन्हा आंदोलन छेडणार आहे.
-ज्ञानेश्वर उढाण, कार्यकर्ता युवा शेतकरी संघर्ष समिती
Comments
Post a Comment