अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना नूतन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांची कामगीरी

 जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी श्रीमती आशिमा मित्तल यांची नियुक्ती; नाशिक जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्याचा ठसा


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      श्रीमती आशिमा मित्तल यांनी शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. याआधी त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नाशिक येथे कार्यरत असताना त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः शिक्षण आणि बालविकास यामध्ये अनेक स्तुत्य उपक्रमांची अंमलबजावणी करून आपली प्रशासकीय कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

      श्रीमती मित्तल या मूळच्या राजस्थान राज्यातील जयपूर येथील रहिवासी असून त्यांनी आयआयटी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. पदवी प्राप्त केली आहे. या अभ्यासक्रमात त्यांना शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदक प्राप्त झाले. त्यांनी नंतर मानववंशशास्त्र (Anthropology) या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

     सन 2017 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण करत देशात 12 वा क्रमांक पटकावणाऱ्या श्रीमती मित्तल यांनी 2018 साली महाराष्ट्र कॅडरमध्ये रुजू होऊन प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. डहाणू येथे आयटीडीपी प्रकल्प अधिकारी, तसेच अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रारंभिक सेवा बजावली.

     नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर 50’ उपक्रम राबवला. या अंतर्गत 200 विद्यार्थ्यांना JEE, NEET व CET परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देण्यात आले. यातील 22 विद्यार्थ्यांनी JEE Main परीक्षा उत्तीर्ण केली, तर 7 विद्यार्थ्यांनी JEE Advanced मध्ये यश संपादन करून IITमध्ये प्रवेश मिळवला.

   राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. या यशाबद्दल राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून श्रीमती मित्तल यांना विशेष प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच ‘भगवान महावीर स्वामी निर्वाण कल्याणक’ निमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत सर्वाधिक विद्यार्थी सहभागी झाल्याबद्दल महामहिम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार झाला.

     मुख्यमंत्री कार्यालयीन सुधारणा उपक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला असून दि. 7 मे 2025 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीमती मित्तल यांचा सत्कार करण्यात आला.

    बालकांचे पोषण आणि कल्याण या क्षेत्रात त्यांनी उचललेली पावले विशेष कौतुकास्पद ठरली. सलग दोन वर्षे – 2023 व 2024 – महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाने त्यांना ‘बालस्नेही पुरस्कार’ प्रदान केला आहे.

  3030 स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांना वीज जोडणी देण्यासाठी राबवलेल्या विशेष अभियानात नाशिक जिल्ह्याने आघाडी घेतली. या उपक्रमामुळे राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी केंद्रांसाठी वीजजोडणीचा अनुकरणीय आदर्श निर्माण झाला आहे.

    प्रशासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कार्य केले असून अनेक स्वयंसेवी संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेमुळेच प्रशासकीय सेवेत येण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्या स्पष्टपणे सांगतात.

   श्रीमती आशिमा मित्तल यांचा अनुभव, कार्यक्षमता व सामाजिक भान यामुळे जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्या निश्चितच प्रभावी ठरणार आहेत, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog