घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालना -जिवंत व्यक्तीला मृत दाखवून ६.७८ लाखांचा अपहार - बनावट कामगार नोंदणी घोटाळ्याचा पर्दाफाश



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

      शासनाच्या कामगार कल्याण योजनेतील निधी अपहाराचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल ६ लाख ७८ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला असून, याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती मिळाली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, कामगार नोंदणी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची व्याप्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.

फसवणुकीचा प्रकार कसा उघड झाला?

      छत्रपती संभाजीनगर येथील कामगार विभागाचे सरकारी अधिकारी गोविंद गावंडे यांनी या प्रकरणाची तक्रार मंठा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. गावंडे व त्यांच्यासोबतच्या दक्षता पथकाने आकणी गावात प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता, स्वाती शिवाजी उबाळे, देवराव नारायण बदर आणि दुर्योधन रामभाऊ जाधव यांच्या नावाने सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

     ग्रामसेवक खेडकर यांनी स्पष्ट केले की, संबंधित तिघे आकणी गावचे रहिवासी नाहीत आणि ग्रामपंचायतीकडून कोणतेही मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यात आलेले नाही. मात्र, नातेवाईक व दलालांनी संगनमताने बनावट मृत्यू प्रमाणपत्रे, ग्रामपंचायतीचे खोटे सही-शिक्के वापरून शासनाचा निधी लाटला.

गुन्हा दाखल – पुढील तपास सुरू

     या प्रकारात शिवाजी लक्ष्मण उबाळे, कमल देवराव बदर आणि तेजस दुर्योधन जाधव यांच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार संतोष माळगे हे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

तालुक्यात बनावट कामगार नोंदणीचा मोठा घोटाळा?

    या घटनेच्या अनुषंगाने, मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बनावट कामगार नोंदणी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंठा शहर, तळणी परिसर तसेच अन्य ग्रामीण भागात ऑनलाईन सेवा केंद्र चालक आणि दलालांनी संगनमताने आधारकार्डमध्ये फेरफार करून नागरिकांची बनावट कामगार नोंदणी केली, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

५० टक्क्यांहून अधिक मतदारांची संशयास्पद नोंदणी?

    स्थानीय नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मंठा तालुक्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक मतदारांची ऑनलाईन कामगार नोंदणी झाली असून, त्यांच्याच नावावर कामगार अनुदान, शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यात आला आहे. हे सर्व प्रकार संबंधितांची माहिती न देता आणि त्यांचा गैरफायदा घेऊन करण्यात आले.

सेवा केंद्र चालक व दलालांचा संगनमत?

    वाटूर रोडवरील काही विशिष्ट सेवा केंद्रासह मंठा शहरातील काही सेवा केंद्र चालकांनी, दलालांच्या मदतीने आधार माहितीमध्ये फेरफार करत फसवणूक केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी संबंधितांकडून हजारोंच्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले असून, आर्थिक शोषणाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.

नागरिकांची मागणी – दोषींवर कठोर कारवाई करा

     या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मंठा तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. शासनाच्या योजनांचा गैरवापर करून गरजूंना लाभापासून वंचित ठेवणाऱ्यांना कोणतीही गय नको, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

    या प्रकरणी पुढील तपास काय दिशा घेतो आणि आणखी कोणकोणत्या नावांचा उलगडा होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या